Wednesday, August 12, 2020

नाट्य-सिनेमा कलावंत,निर्माता,दिग्दर्शक मनोज देशपांडे याच्या कारकिर्दिची पन्नास वर्षे....

नाट्य-सिनेमा कलावंत,निर्माता,दिग्दर्शक मनोज देशपांडे याच्या कारकिर्दिची पन्नास वर्षे....


मनोज देशपांडे ला ओळखत नाही असा नाट्य-चित्रपट सृष्टीतला मला तरी अजून पुण्यात तरी कुणी भेटलेला नाही.

नुकतीच ४ ऑगस्ट  ला मनोज नी वयाच्या साठाव्या वर्षात पदार्पण केलं. मनोजचं वय त्याच्या शरिरयष्टीकडे बघून कधीच लक्षात येणार नाही. तो साठीला पोहोचला असेल असं तर अजिबातच वाटत नाही. हे अजब रसायन काय आहे ते समजून घेण्यासाठी त्याच्याशी खास बातचीत करायचं ठरवलं. महानायक अमिताभ बच्चन मला व्यक्तिशः ओळखतो, कालच तुमच्या बिल्डींग मध्ये राजदत्त आले होते, त्यांना भेटायला आलो होतो,वाटेत भेटला तर, थोडा घाईत आहे, उर्मिला मातोंडकरला भेटायला चाललो आहे, किंवा अरे वर्षा उसगावकर बराच वेळ वाट बघत थांबली आहे, पुढे एका शुटिंगला जायचं आहे, असं जेव्हा मनोज छातीठोकपणे सांगतो , तेव्हा तो निव्वळ थापा मारतोय असाच माझा समज होता.

मध्यंतरी नाट्य-चित्रपट क्षेत्रात त्याला पन्नास वर्षे झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आल्याचा फोटो त्याने व्हॉटस अप वर मला पाठवला होता, तेव्हाच या पठ्ठ्याला गाठून त्याची मुलाखत घ्यायची असं ठरवलं होतं. लॉकडाउन मुळे ते थोडं पुढे गेलं.

बालनाट्यातून रंगभुमीवर पदार्पण :                                                                          वयाच्या १० व्या वर्षीच मनोज नी नाटकात काम करायला सुरुवात केली. अभिनयाचं बाळकडू त्याला त्याचे आजोबा बाळकृष्ण रंगराव देशपांडे यांच्याकडून मिळालं. भाषाप्रभू राम गणेश गडकरी आणि त्याचे आजोबा हे सख्खे आत्तेमामेभाऊ होते.

मनोज चे आजोबा हे नाट्यकलाकार होते.ते इतर नाटकांबरोबरच गडकरींच्या ‘एकच प्याला’ मध्येही “तळीरामाची” भूमिका करीत असत. आजोबांमुळे मनोजवर अभिनयाचे संस्कार हे बालपणापासूनच होत होते.

मनोज मधील उपजतच असलेले अभिनयाचे गुण ओळखून त्याच्या आजोबांनी त्याला भारत स्काऊट आणि गाईड येथे नाट्यसंस्थेमध्ये नेऊन दाखल केले. तेथील नाटकांमध्ये मनोज वयाच्या दहाव्या वर्षीपासूनच काम करायला लागला.

ज्येष्ठ नाट्यकर्मी अण्णा राजगुरू यांच्या ‘ शिशुरंजन’ या बालनाट्य संस्थेमध्ये मनोज मधील अभिनय गुणांना चांगला वाव मिळाला. ‘ शिशुरंजन’ तर्फे तेव्हा रत्नाकर मतकरी लिखित आणि प्रा. शिरीष लिमये दिग्दर्शित “राक्षस राज झिंदाबाद’ या नाटकामध्ये मनोज ला ‘ चष्मासुर’ ही प्रमुख भूमिका मिळाली. त्याच्यासोबत त्यावेळी आजची आघाडीची अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही देखील होती. मृणाल कुलकर्णी चे देखील ते रंगभूमीवरील पहिलेच नाटक होते,असे मनोजने मला सांगितले. ‘ चष्मासुर’ ही भूमिका मनोज साठी बरीच आव्हानात्मक होती कारण रंगभूमीवर त्याआधी सादर झालेल्या ‘ राक्षसराज’ च्या प्रयोगांमध्ये ‘ चष्मासुर’ ही भूमिका दिलीप प्रभावळकर करीत असत. मनोजने सादर केलेला चष्मासुर, बरीच दाद मिळवून गेला. त्याकाळी ते नाटक पाहिलेले कित्येक जाणकार आजही मनोज ला ‘ चष्मासुर’ म्हणूनच ओळखतात. त्यानंतर मनोजने बऱ्याच नाटकांमध्ये भूमिका केल्या. त्याचे एकंदर अभिनय कौशल्य पाहून त्याला प्रा. जब्बार पटेल यांनी त्यांच्या ‘ थिएटर अकॅडमी’ मध्ये संधी दिली. थिएटर अकॅडमीची ‘घाशीराम कोतवाल’, ‘तिन पैशाचा तमाशा’, ‘पडघम’ ही नाटके सादर झाली व चांगलीच गाजली. मनोज या तिन्ही नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसायचा,असे त्याने सांगितले.

चित्रपट सृष्टीत पदार्पण :                                                                                              १९८० साली मनोजला चित्रपटांत भूमिका करण्याची संधी मिळाली. त्याचा पहिला चित्रपट ‘ तुझ्या वाचून करमेना’ हा आला. त्यानंतर त्याने ‘ सगे सोयरे’, ‘अकलेचे कांदे ‘,’ ‘साक्षात्कार’, ‘ओम शांती ‘या चित्रपटातून काम केले. हिंदी मध्ये’ ‘होली’ या चित्रपटात अमिर खान, नसरूद्दिन शाह, दिप्ती नवल, ओम पुरी आदि दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

महानायकाच्या सहवासात…                                                                                           ‘मै आझाद हूँ’ या चित्रपटात मनोज ला ‘महानायक अमिताभ बच्चन’ यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. ह्या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, पुणे असे सुमारे दोन महिने चालले होते. त्यानिमित्ताने मनोज ला अमिताभ बच्चन यांचा सहवास लाभला. अमिताभ बच्चन यांच्या घरी जाण्याचा देखील बरेचदा योग आला. त्याचदरम्यान अमिताभ बच्चन यांच्याशी मनोजची बरीच जवळीक निर्माण झाली. अमिताभ यांचेकडून त्याला इंडस्ट्री मधले बरेच एटिकेट, मॅनर्स, सहकलाकारांशी आत्मियतेने वागण्याबोलण्याची पध्दत अशा बर्‍याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. एकंदरीतच महानायकाच्या सहवासातील हा कालावधी मनोजला भविष्यकाळासाठी खूप काही देणारा ठरला. टिनू आनंद, साजीद व हबीब नडियादवाला ह्यांच्यासारखे मित्र मिळाले असे मनोजने सांगितले.

मनोजच्या आयुष्यातील मैलाचा दगड म्हणता येईल असा अनुभव म्हणजे त्याला लंडनमधील हेलन सॉसी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ City of Seven Deadly Scenes’ या नाटकामध्ये काम करण्याची मिळालेली संधी हा होय. या नाटकात कुठल्याही प्रकारचे डायलॉग नव्हते. संपूर्ण नाटक हे कलाकारांचा अभिनय आणि त्याला पुरक असे ‘साऊंड आणि लाईट इफेक्ट्स’ यावर उभं केलेलं होतं. याच दरम्यान मनोज ची अमिन सयानी यांच्याशी दृढ मैत्री झाली.

नाट्य-सिने विश्वात “रोमान्स स्पेशालिस्ट ” म्हणून ओळख : नाटक-सिनेमा क्षेत्रात मला ‘रोमान्स स्पेशालिस्ट’ म्हणूनच ओळखतात. कारण बर्‍याच दिग्दर्शकांना नाटक-सिनेमा मध्ये ‘रोमांटिक सिन्स’ कसे उभे करायचे, रोमान्स म्हणजे नक्की काय असतं हेच माहिती नसते. अशावेळी त्यांना मनोज देशपांडे मदतीला येतात. रोमान्सचं तंत्र खूप वेगळं आहे. ते नीट जमलं नाही तर चांगल्या कथानकाचा बट्ट्याबोळ होऊ शकतो. हे तंत्र कुठल्याही नाटक – सिनेमाच्या प्रशिक्षण वर्गांमध्ये सहसा शिकवलं जात नाही.असं मनोज देशपांडे यानी सांगितले.

"कास्टिंग डायरेक्टर " म्हणून नावलौकिकः                                                            कुठलीही नाट्य- चित्रकृती उभी करतांना त्यातील भुमिकेसाठी योग्य त्या कलाकाराची निवड करणे हे आणखी एक आव्हानात्मक काम असते. कथानकातील लेखकाला अभिप्रेत असलेलं पात्र सादर करण्याची कलाकाराची ताकद आहे किंवा नाही हे कित्येक दिग्दर्शकांना ओळखता येत नाही. अशा वेळेस मनोज देशपांडे सारख्या मुरब्बी निवडकर्त्याच्या मार्गदर्शनाची दिग्दर्शकाला मदत घ्यावी लागते. मनोजला कलाकार निवडीचं कसब चांगलंच गवसलेलं आहे,त्यात त्याची मास्टरी आहे, असे त्यानी सांगितले. त्यामुळेच कित्येक निर्माते – दिग्दर्शक माझं मार्गदर्शन घेतात असं तो म्हणाला. त्यामुळेच महाराष्ट्रात होणाऱ्या कित्येक नाटक – सिनेमांच्या, फॅशन शोज् ची ‘ कास्टिंग डायरेक्टर’ म्हणून जबाबदारी माझ्यावरच असते असे त्यानी सांगितले. पुण्यातील फिल्म एण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट (F.T.I.I.) च्या ‘कलाकार निवड समितीचा’ तो अध्यक्ष आहे,असं तो म्हणाला. ही मुलाखत चालू असताना देखील मनोज चा मोबाईल सतत वाजत होता. सध्या तो चिं. त्र्यं.खानोलकर यांच्या ‘ अवध्य’ या नाटकाचे दिग्दर्शन व सादरीकरण करतो आहे. त्या नाटकांमधील भूमिकांसाठी इच्छुक असलेले कलाकार त्याच्याशी संपर्क साधत होते. या नाटकात दिग्दर्शनाबरोबरच तो स्वतः ‘पोतदार’ ही भूमिका करतो आहे. त्याच्या अप्रतिम अभिनयामुळे त्याची ह्या नाटकातली भूमिका त्याच्या रंगमंचावरील एंट्री आणि एक्झिट ला प्रचंड टाळ्या घेऊन जाते आहे असे तो म्हणाला. इतर ८ रोमांटिक चित्रपट,३ टिव्ही सिरीयल्स आणि २ वेब सिरीज चा ‘कास्टिंग डायरेक्टर’ म्हणून तो जबाबदारी सांभाळतो आहे.असे त्याने सांगितले. ज्या कुणाला हौशी अथवा व्यवसायिक कलाकारांना अभिनयाची इच्छा असेल त्यांनी त्याच्याशी संपर्क साधावा असं त्याने आवर्जून सांगितले. नाटक-सिनेमा क्षेत्रात यायला घरच्यांनी विरोध केला तरी त्यांचे काऊन्सेलींग करून परवानगी मिळवून देण्यासाठी तो कलाकारांना मदत करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो.

मनोज देशपांडे म्हणजे, अभिनयाचे चालतेबोलते प्रशिक्षण केंद्र:                              मनोजचा आणखी महत्वाचा उपक्रम म्हणजे नाट्य-चित्रपट कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण तो विनामोबदला देतो.त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलावंत आज नावारूपाला आले आहेत. त्याचबरोबर फॅशन शो साठी आवश्यक असणारे ‘ कॅट वॉक’ चे प्रशिक्षण तो युवक युवतींना देतो. .कित्येकांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फॅशन शो मध्ये उत्तम यश मिळाले असल्याचे त्याने सांगितले.

सीकेपी समाजातील सदैव अग्रभागी असणारा कार्यकर्ता म्हणूनही ओळख:           मनोजचे, देशपांडे घराणे हे वतनदार आहे. त्यामुळे मनोज च्या मुळशी तालुक्यातीलवारक व इतर काही गावांमध्ये एकारांनी जमिनी आजही आहेत. त्याच्या सीकेपी समाजामध्ये त्यामुळेच त्याला बराच मान आहे, असं तो अतिशय विनम्रपणे सांगतो. सीकेपी समाजातील कुठल्याही कार्यक्रमाला मनोजला मानाचं निमंत्रण असतं आणि चित्रसृष्टीच्या कामात कितीही व्यस्त असला तरी तोही सहसा कुठलेही कार्यक्रम चुकवत नाही. समाजातील संस्थाना शक्य तेवढी मदत तो आवर्जून करतो.असं तो म्हणाला.

अनेक पुरस्कार व सन्मान:                                                                                      मनोजच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याचे अनेक ठिकाणी सत्कार झालेले आहेत. सोलापूर येथे कविवर्य ना. धो. महानोर यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. त्याला मिळालेल्या सन्मान व पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. विस्तार भयास्तव मी ती इथे देत नाही. त्याला रंगभूमीवर ५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल त्याचा भव्य नागरी सत्कार, महाराष्ट्रातील विविध संस्थांतर्फे करण्याचे नियोजन होते परंतु ‘ करोना महामारी’ मुळे तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

रंगदेवतेची गेली ५० वर्षे निरपेक्षपणे सेवा करणाऱ्या मनोज देशपांडे याला मनःपूर्वक शुभेच्छा !

मनोज देशपांडे यांचा मोबाईल नंबर : +919765556553

Wednesday, June 28, 2017

पुणेरी पुणेकर...

पुणेकर आणी  पावसाळा....
"पावसाळा" हा काही जगभरात फक्त पुण्यातच येतो असं नाही परंतु पुण्यातला पाउस हा पुणेकरांप्रमाणेच वैशिष्ठ्यपूर्ण असतो.ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी पुण्याच्या पावसाचं "पिरपीऱ्या" असं अतिशय सार्थ नामकरण केलं आहे.मुंबईच्या पावसाचा तोरा काही वेगळाच असतो.तो धडाधड पडायला लागला की थांबायचं नाव घेत नाही.पाउस कितीही 'बदाबद' कोसळत असला तरी मुंबईकरही थांबण्याचं नाव घेत नाही.थांबणं हा शब्द मुंबईच्या शब्दकोषातून जणू हद्दपारच करण्यात आलेला आहे असं वाटतं.येवढ्या पावसात घराबाहेर पडायला, ह्यांचं घराबाहेर काय  गाठोडं बांधून ठेवलेलं असतं असा  माझ्या सारख्या बाॅर्न पुणेकराला कायमच   प्रश्न पडतो.
पिरपीऱ्या पुणेकरांसारखाच पुण्याचा पाउसही पिरपीराच असतो. तो दिवस अन् दिवस पिर पीर पडत असतो.अस्सल पुणेकर हा  तसा मुळात सगळ्याच बाबतीत निरूत्साही,त्यामुळेच पावसाळ्यासारख्या 'अॅडव्हर्स कंडिशन' मधे तर तो 'बॅड वेदर' जाहिर करून सगळ्याच गोष्टी पुढे ढकलतो.मुळात येवढ्या पावसात एखाद्या कामाला जायलाच पाहिजे का ? ह्याचा विचार करण्यातच बराच वेळ घरातच घालवतो.हल्लीच पुण्यामधे छत्री,रेनकोट वगैरे अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची फॅशन आली आहे.पण त्याचा वापर मुंबईकरांसारखा पटकन् उघडली छत्री  किंवा घातला रेनकोट अन् लागला कामाला असा फारसा होत नाही.पुर्वी तर पुणेकरांचा रेनकोट,छत्री खरेदी करण्याचा अभ्यासपूर्ण निर्णय होईपर्यंत पावसाळा संपत येत असे आणी आता काय पावसाळा संपतच आलाय, थोडक्यासाठी कशाला घरात पडून रहायला छत्री घ्यायची,पुढच्या वर्षीच पाहूयात म्हणून उभी हयात विना छत्रीची काढलेली बरीच मंडळी मी पाहिलेली आहेत.
पुण्यामधे पावसाळा हा घरात बसून मस्तपैकी भज्यांवर ताव मारण्याचा मोसम असतो.बाहेर पाउस पिरपीरत असला की पुणेकर घराच्या खिडकीमधूनच बाहेर पहात मस्त भज्याची हवा झालीय असं जाहिर करून घरातच गरमागरम भजी खात बसणे पसंत करतो.हल्ली हल्लीच जरा फॅशनम्हणून भर पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी जीवाला फारसा त्रास होणार नाही इतपत जवळच्या अंतरावर आउटिंगला जायची फॅशन आली आहे पण  अस्सल पुणेकर मात्र सुट्टीच्या दिवशी त्या ट्रॅफिक जॅम मधे कुठे बाहेर पडायला नकोसंच वाटतं म्हणत घरी बसणंच प्रिफर करतो.अगदी झालंच तर रविवारी सकाळी पॅटिस च्या ऐवजी तुळशीबागेतल्या श्रीकृष्णची किंवा सदाशिव पेठेतल्या श्री ची किंवा बेडेकरची मिसळ, लाईनीला लागून खायला जातो.रूपाली,वैशाली मधे डोसा खायला जाणे हा "पावसाळी उपक्रम" ह्या सदरात मोडत नाही.अस्सल कोल्हापूर वगैरे नावाखाली गल्लीबोळात निघालेल्या मिसळीच्या दुकाने ही मान्यताप्राप्त नाहीत त्यामुळे असल्या ठिकाणी जाउन मिसळ खाणे हा प्रकार म्हणजे निव्वळ 'वेस्ट आॅफ मनी' आहे असे अस्सल पुणेकर समजतो.त्यामुळे ती पावसाळ्यातली मज्जा मानली जात नाही.
नेमेची येतो मग पावसाळा.... त्यात काय येवढं ? असं मानणाराही एक वर्ग आहे,पण ही प्रजाती आता बदलत्या काळात दुर्मिळ होते आहे.
"आमचे पुणे आणी  पुणेकर" ह्या विषयी आणखी बरंच काही लिहायचं आहे पण ते पुढे पुढे...