पुणेकर आणी पावसाळा....
"पावसाळा" हा काही जगभरात फक्त पुण्यातच येतो असं नाही परंतु पुण्यातला पाउस हा पुणेकरांप्रमाणेच वैशिष्ठ्यपूर्ण असतो.ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी पुण्याच्या पावसाचं "पिरपीऱ्या" असं अतिशय सार्थ नामकरण केलं आहे.मुंबईच्या पावसाचा तोरा काही वेगळाच असतो.तो धडाधड पडायला लागला की थांबायचं नाव घेत नाही.पाउस कितीही 'बदाबद' कोसळत असला तरी मुंबईकरही थांबण्याचं नाव घेत नाही.थांबणं हा शब्द मुंबईच्या शब्दकोषातून जणू हद्दपारच करण्यात आलेला आहे असं वाटतं.येवढ्या पावसात घराबाहेर पडायला, ह्यांचं घराबाहेर काय गाठोडं बांधून ठेवलेलं असतं असा माझ्या सारख्या बाॅर्न पुणेकराला कायमच प्रश्न पडतो.पिरपीऱ्या पुणेकरांसारखाच पुण्याचा पाउसही पिरपीराच असतो. तो दिवस अन् दिवस पिर पीर पडत असतो.अस्सल पुणेकर हा तसा मुळात सगळ्याच बाबतीत निरूत्साही,त्यामुळेच पावसाळ्यासारख्या 'अॅडव्हर्स कंडिशन' मधे तर तो 'बॅड वेदर' जाहिर करून सगळ्याच गोष्टी पुढे ढकलतो.मुळात येवढ्या पावसात एखाद्या कामाला जायलाच पाहिजे का ? ह्याचा विचार करण्यातच बराच वेळ घरातच घालवतो.हल्लीच पुण्यामधे छत्री,रेनकोट वगैरे अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची फॅशन आली आहे.पण त्याचा वापर मुंबईकरांसारखा पटकन् उघडली छत्री किंवा घातला रेनकोट अन् लागला कामाला असा फारसा होत नाही.पुर्वी तर पुणेकरांचा रेनकोट,छत्री खरेदी करण्याचा अभ्यासपूर्ण निर्णय होईपर्यंत पावसाळा संपत येत असे आणी आता काय पावसाळा संपतच आलाय, थोडक्यासाठी कशाला घरात पडून रहायला छत्री घ्यायची,पुढच्या वर्षीच पाहूयात म्हणून उभी हयात विना छत्रीची काढलेली बरीच मंडळी मी पाहिलेली आहेत.
पुण्यामधे पावसाळा हा घरात बसून मस्तपैकी भज्यांवर ताव मारण्याचा मोसम असतो.बाहेर पाउस पिरपीरत असला की पुणेकर घराच्या खिडकीमधूनच बाहेर पहात मस्त भज्याची हवा झालीय असं जाहिर करून घरातच गरमागरम भजी खात बसणे पसंत करतो.हल्ली हल्लीच जरा फॅशनम्हणून भर पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी जीवाला फारसा त्रास होणार नाही इतपत जवळच्या अंतरावर आउटिंगला जायची फॅशन आली आहे पण अस्सल पुणेकर मात्र सुट्टीच्या दिवशी त्या ट्रॅफिक जॅम मधे कुठे बाहेर पडायला नकोसंच वाटतं म्हणत घरी बसणंच प्रिफर करतो.अगदी झालंच तर रविवारी सकाळी पॅटिस च्या ऐवजी तुळशीबागेतल्या श्रीकृष्णची किंवा सदाशिव पेठेतल्या श्री ची किंवा बेडेकरची मिसळ, लाईनीला लागून खायला जातो.रूपाली,वैशाली मधे डोसा खायला जाणे हा "पावसाळी उपक्रम" ह्या सदरात मोडत नाही.अस्सल कोल्हापूर वगैरे नावाखाली गल्लीबोळात निघालेल्या मिसळीच्या दुकाने ही मान्यताप्राप्त नाहीत त्यामुळे असल्या ठिकाणी जाउन मिसळ खाणे हा प्रकार म्हणजे निव्वळ 'वेस्ट आॅफ मनी' आहे असे अस्सल पुणेकर समजतो.त्यामुळे ती पावसाळ्यातली मज्जा मानली जात नाही.
नेमेची येतो मग पावसाळा.... त्यात काय येवढं ? असं मानणाराही एक वर्ग आहे,पण ही प्रजाती आता बदलत्या काळात दुर्मिळ होते आहे.
"आमचे पुणे आणी पुणेकर" ह्या विषयी आणखी बरंच काही लिहायचं आहे पण ते पुढे पुढे...
पुणे तिथे काय उणे
ReplyDelete